Wednesday, January 19, 2022
Homeमुंबई / नवी मुंबईकर्नाळा बँक घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कधी मौन सोडणार घोटाळेबाजांची पाठराखण करण्याचे...

कर्नाळा बँक घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कधी मौन सोडणार घोटाळेबाजांची पाठराखण करण्याचे पाप ठाकरे सरकार करतोय – किरीट सोमैय्या

कर्नाळा बँक घोटाळ्याने साठ हजार लोकांचे आयुष्य देशोधडीला लावले मात्र तरीही महाविकास आघाडी बघ्याचीच भूमिका घेऊन आजपर्यंत ठेवीदारांकडे दुर्लक्ष करीत आली असून कर्नाळा बँक घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कधी मौन सोडणार असा सवाल सुप्रसिद्ध सनदी लेखापाल माजी खासदार किरीट सोमैय्या यांनी आज (दि. २१) येथे पत्रकार परिषदेत केला.
ठाकरे महाविकास आघाडी सरकारने ठेवीदारांच्या प्रश्नाकडे जाणून बुजून दुर्लक्ष केले असले तरी ठेवीदारांना त्यांच्या ठेवी परत मिळेपर्यंत आमचा संघर्ष कायम असेल असेही त्यांनी यावेळी नमूद केले. ठेवीदारांच्या हितासाठी केंद्राने कारवाई केली मात्र ठाकरे सरकारने कर्नाळा बँक आणि शेकापला वाचवण्यासाठी अद्याप या घोटाळ्यात कुठलीच कारवाई केली नाही, असेही सोमैय्या यांनी अधोरेखित केले.
कर्नाळा नागरी सहकारी बँकेत घोटाळा झाल्यापासून ठेवीदार, खातेदारांना न्याय मिळवून देण्याच्या भूमिकेतून सतत खंबीरपणे कार्यरत असलेल्या कर्नाळा बँक ठेवीदार संघर्ष समितीच्या वतीने पनवेल शहरातील मार्केट यार्ड येथील श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कर्नाळा बँक ठेवीदार संघर्ष समितीचे अध्यक्ष आमदार महेश बालदी, कार्याध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, भाजपचे तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत, सरचिटणीस राजेंद्र पाटील, नगरसेवक हरेश केणी, नगरसेवक बबन मुकादम, ओबीसी सेलचे एकनाथ देशेकर, सहकार सेलचे जिल्हाध्यक्ष कुंडलिक काटकर आदी उपस्थित होते.तत्पुर्वी याच ठिकाणी शेकडो ठेवीदारांची बैठक पार पडली. या लढ्यात विशेष मार्गदर्शन करून सात्तत्याने ठेवीदारांच्या पाठीशी उभे राहणारे माजी खासदार किरीट सोमैय्या यांचा ठेवीदारांनी सत्कार करून आभार मानले.
पत्रकार परिषदेस किरीट सोमैय्या यांनी सांगितले कि, विवेक पाटील यांची २३४ कोटीची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे आणि ६५ दिवस ते जेलमध्ये आहेत. हि कारवाई ईडीने केली आहे. मात्र महाराष्ट्र सरकारने तसू भरपण कारवाई केली नाही. कॉपरेटिव्ह ऍक्ट प्रमाणे कारवाई करण्याचे अधिकार राज्य सरकारचे आहे, असे खासदार शरद पवार सांगतात मग राज्य सरकार का गप्प आहे, असे सांगतानाच शरद पवार साहेब कर्नाळा बँक संदर्भात आपण कधी बोलणार असा सवालही त्यांनी केला. हे राज्य सरकार घोटाळेबाजांचे आहे. मी या सरकारचे अनेक घोटाळे उघड केले. अनिल परब, मिलिंद नार्वेकर यांचे घोटाळे आता सर्वश्रूत झाले आहेत, त्यामुळे माझ्यावर काल शिवसेनेकडून हल्ला करण्यात आला मी त्याबद्दल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे, असे सांगतानाच माझ्यावर कितीही हल्ले होऊ द्या घोटाळेबाजांना सोडणार नाही, असा स्पष्ट ईशाराही त्यांनी दिला. ईडीने मनी लॉन्ड्रींगमुळे विवेक पाटलांना जेलमध्ये टाकले आहे मात्र उद्धव सरकारने कोणतीच कारवाई राज्य शासन म्हणून केली नाही हि अत्यंत चुकीची बाब असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कर्नाळा बँकेवर कारवाई करून नये असे निर्देश दिल्यामुळेच राज्य सरकारकडून कारवाई झाली नाही असेही त्यांनी अधोरेखित केले.उद्धव ठाकरे घोटाळेबाजांना सपोर्ट करण्याचे तर मोदी सरकार घोटाळेबाजांना जेलमध्ये टाकण्याचे काम करीत असल्याचे त्यांनी आवर्जून नमूद केले. तसेच ईडी जर विवेक पाटीलांना अटक करू शकते तर राज्य सरकार कुठलीच कारवाई का करत नाही असा सवालही त्यांनी उपस्थित केला.येत्या ९० दिवसात म्हणजेच दिवाळीपर्यंत पाच लाख आतील रक्कम ठेवीदारांना परत मिळतील आणि त्यासाठी आमचा कायम पाठपुरावा असून येत्या आठवड्यात त्याचा रितसर फॉर्म पनवेलमध्ये उपलब्ध करून देणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
आमदार प्रशांत ठाकूर यांनी यावेळी बोलताना सांगितले कि, २८ सप्टेंबर २०१९ ला लढ्याच्या पहिल्या दिवसापासून माजी खासदार किरीट सोमैय्या यांच्या मार्गदशनाखाली लढाई सुरु झाली. घोटाळ्याचे आरबीआयला पत्र त्याचा पाठपुरावा, रिझर्व्ह बँकेवर मोर्चा, बँकेवर मोर्चा, सीआयडी, पोलीस आयुक्त, सहकार, ईडी, यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला. त्यावेळी अनेकांना बँकेत घोटाळा झाल्याचे मान्य नव्हते. विवेक पाटील यांनी तर छातीठोकपणे घोटाळा झालाच नाही, मी पैसे खाल्ले असेल तर स्वतःला जाळून घेईन असा स्पष्ट निर्वाळा दिला होता. राजाचे राजपण आजपण आणि उद्यापण असे बॅनरबाजी करून शेकापच्या नेत्यांनी अकलेचे तारे तोडले होते. आता मोदी सरकारच्या निर्णयामुळे पाच लक्ष पर्यंत सुरक्षा म्हणून पैसे मिळणार आहेत. मात्र शेकाप लोकांचे पैसे परत देतोय असा संदेश शेकापकडून प्रसारित केला जात आहे. पाच लाखापेक्षा कमी रक्कमेचे ४९४२३ ठेवीदार आहेत आणि त्यांची एकूण रक्कम २४० कोटी आहे आणि ती केंद्र सरकारच्या निर्णयांनुसार विमा संरक्षणाच्या माध्यमातून परत मिळणार आहे. तर ०५ लाखपेक्षा जास्त रक्कम असलेले २२५१ ठेवीदार असून त्यांचे २९४ कोटी रुपयांची ठेवी आहे. केंद्राच्या निर्णयाचा क्रेडिट शेकाप घेऊ पाहत आहे मग उर्वरित ठेवीदारांचे २९४ कोटी रुपये शेकापनेते देणार का? असा सवाल आमदार प्रशांत ठाकूर यांनी उपस्थित करून २९४ कोटी रुपये ठेवीदारांना देण्याचे एकाअर्थी शेकापला चॅलेंज दिले आहे.
आमदार महेश बालदी यांनी म्हंटले कि, विवेक पाटील जेलबाहेर आल्यावर फटाके वाजवणार असे आमदार बाळाराम पाटील यांनी मेळाव्यात म्हंटले. ज्याने ६० हजार लोकांना देशोधडीला लावले त्यांच्यासाठी फटके फोडण्याचे निर्लज्जपणे वक्तव्य करणे म्हणजे ठेवीदारांचा अपमान आहे. या घोटाळ्याची तक्रार नोंद झाली तेव्हापासून महाविकास आघाडीतील काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मूग गिळून गप्प बसले आहे. शेकापने बँक बुडवली मात्र त्यांना महाविकास आघाडी सरकारने सपोर्ट केले. त्यामुळेच आता पर्यंत ठाकरे सरकारकडून कोणतीच कारवाई झाली नाही. ईडीने कारवाई केली प्रॉपर्टी जप्त केली पण राज्य सरकारने बँकेचे हेमंत सुताने आणि संचालकांवर अद्यापपर्यंत अटक कारवाई का केली नाही, असा सवालही त्यांनी यावेळी केला. महाविकास आघाडीतील एकाही नेत्याने ठेवीदारांसाठी संघर्ष केला नसून कर्नाळा घोटाळ्याला पाठीशी घालणाऱ्या तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांना ठेवीदारांचा शाप लागला आहे म्हणून त्यांच्यावर हि वेळ आली आहे, असेही त्यांनी नमूद केले.

शेकाप नेते तेव्हा कुठे लपून बसलात

कर्नाळा बँकेच्या घोटाळ्यामुळे अनेकांना नित्यांत गरजेच्या वेळी पैसे मिळाले नाहीत. उपचार, लग्न, आजार, अशा महत्वाच्या वेळी स्वतःचे पैसे असतानाही ते न मिळणे यासारखी दुर्देवी बाब नाही. ग्रामपंचायतींचेही करोडो रुपये विवेक पाटील यांनी गिळंकृत केल्याने अनेक गावांचा विकासही खुंटला आहे. उपचाराअभावी अनेक जण मृत्यूच्या दारात आले त्यावेळीही विवेक पाटील यांनी दमडी न देता फक्त फुशारक्या मारल्या त्यामुळे अनेक जणांना नाहक प्राण गमवावे याची जबाबदारी शेकाप घेणार का? . ‘बँक व्यवस्थित आहे’ असा यापूर्वी आव आणणारे आणि कालांतराने बँकेचे अध्यक्ष व शेकापचे माजी आमदार विवेक पाटील यांना अटक झाल्यानंतर ‘आम्ही सगळे पैसे परत करू आणि मग फटाके वाजवू’ असे म्हणणारे आमदार बाळाराम पाटील आता शेकापची उरलीसुरली लाज वाचवण्यासाठी पुन्हा आपल्याच कार्यकर्त्यांना कामाला लावून जनतेची सहानुभूती मिळवण्याचा केविलवाणा प्रयत्न करीत असल्याची चर्चा पनवेलकरांमध्ये आहे. मुळातच कर्नाळा बँकेचा एवढा मोठा घोटाळा झाला असताना त्यावेळी शेकापचे नेते मंडळी कुठं लपून बसले होते. असा सवालही या निमिताने उपस्थित झाला आहे.
केंद्राच्या निर्णयाचे श्रेय लाटण्याचा प्रकार
रिझर्व्ह बँकेने आता कर्नाळा बँकेचा व्यवसाय परवाना ‘बँकिंग बिझनेस इन इंडिया अंडर रेग्युरेशन २२ सेक्शन ५६, रेग्युरेशन अ‍ॅक्ट १९४९’नुसार रद्द करीत असल्याची अधिसूचना जारी केल्यामुळे कर्नाळा बँकेत ठेवलेल्या रकमेपैकी पाच लाखापर्यंतच्या ठेवी (डीआयसीजीसी) रिझर्व्ह बँक ठेवी विमा संरक्षण व क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशनच्या नव्या नियमानुसार ठेवीदारांना परत मिळणार आहेत. त्याचे श्रेय घेण्यासाठी शेकापच्या नेत्यांनी ठेवीदारांना तुमच्या ठेवी परत देत आहोत. त्यासाठी तुमची माहिती भरून द्या, असा मेसेज पाठवला आहे. बँकेत भ्रष्टाचार करून आता आम्हीच तुमचे पैसे परत देत आहोत हे सांगणे म्हणजे, ‘आयजीच्या जीवावर बायजी उदार’ असा आव आणण्याचा केविलवाणा प्रयत्न शेकाप नेत्यांचा सुरू असल्याचे दिसून येत आहे. केंद्र सरकारने ठेवीदारांच्या दृष्टिकोनातून मोठा दिलासा दिला आहे. मात्र राज्यातील महाविकास आघाडी सरकार याकडे जाणून बुजून सुरुवातीपासून दुर्लक्ष केले आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments