Wednesday, January 19, 2022
Homeमुंबई / नवी मुंबईविमानतळाला लोकनेते दि.बा.पाटील यांचे नाव देण्यासाठी भूमिपुत्रांचा मशाल मोर्चा

विमानतळाला लोकनेते दि.बा.पाटील यांचे नाव देण्यासाठी भूमिपुत्रांचा मशाल मोर्चा

जो पर्यंत नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव दिले जात नाही, तो पर्यंत संघर्षाची मशाल विझणार नाही, असा ईशारा आज जासई येथे झालेल्या मशाल मोर्चातून राज्य सरकारला देण्यात आला. १५ ऑगस्ट हि डेडलाईन आहे, या तारखेपर्यंत राज्य सरकारने प्रकल्पग्रस्तांच्या बाजूने सकारात्मक प्रतिसाद दिला नाही तर दिबासाहेबांच्या जन्मभूमीत प्रज्वलित करण्यात आलेल्या या मशालीचे रूपांतर १६ ऑगस्टपासून क्रांतीच्या वणव्यामध्ये करण्याचा निर्धार यावेळी प्रकल्पग्रस्त भूमिपुत्रांनी केला.

लोकनेते दि बा पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वपक्षीय कृती समितीचे अध्यक्ष दशरथ पाटील व मध्यवर्ती समितीच्या सुचनेनुसार नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्र समन्वय समितीच्या वतीने ०९ ऑगस्ट रोजी क्रांती दिनाच्या निमित्ताने नवी मुंबई येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचेच नाव देण्यात यावे यासाठी लोकनेते दि.बा. पाटील यांच्या जन्म स्थळी जासई, तालुका उरण, जिल्हा रायगड येथे भव्य दिव्य असे मशाल यात्रेचे आयोजन करण्यात आले होते.

सर्वप्रथम श्री छत्रपती शिवाजी महाराज हायस्कूल जासई येथील हुतात्मा मैदान येथून मशाल पेटवून ती मशाल लोकनेते दि.बा. पाटील सभागृह जासई येथे आणण्यात आले. यावेळी सभागृहात व्यासपीठावर लोकनेते दि.बा. पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरण सर्वपक्षीय कृती समितीचे अध्यक्ष दशरथ पाटील, लोकनेते माजी खासदार रामशेठ ठाकूर,आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, JNPT चे विश्वस्त कॉम्रेड भूषण पाटील, पनवेल महानगरपालीकेचे सभागृह नेते परेश ठाकूर, स्वर्गीय लोकनेते दि.बा. पाटील यांचे सुपुत्र अतुल पाटील, २७ गाव समितीचे नंदराज मुंगाजी, दशरथ भगत, मुंबई कृषी उत्त्पन्न बाजार समितीचे संचालक राजेंद्र पाटील, उरण पंचायत समितीचे माजी सभापती नरेश घरत, साई संस्थान वहाळचे संस्थापक रवी पाटील, महिला सामाजिक कार्यकर्त्या सीमा घरत,रेखा घरत,आगरी कोळी कराडी संघर्ष सामाजिक संस्थेचे अध्यक्ष रुपेश धुमाळ,पनवेल महानगर पालिकेचे उपमहापौर जगदीश गायकवाड,कामगार नेते सुरेश पाटील, लोकनेते दि.बा.पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरण सर्वपक्षीय कृती समिती,उरण सामाजिक संस्था,भूमीपुत्र ट्विटर ग्रुप,आगरी कोळी युथ फॉउंडेशन, दि.बा.पाटील युथ फोरम,95 गाव गावठाण विस्तार समिती,अखिल कराडी समाज संघटना,आगरी युवा मंच,विविध प्रकल्पग्रस्त संघटना.तसेच सर्वच राजकीय पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते यावेळी विविध मान्यवरांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

नवी मुंबई आंतर राष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि.बा. पाटील यांचे नाव देण्यात यावे असे येथील स्थानिक भूमिपुत्र, प्रकल्पग्रस्तांची मागणी आहे. या मागणी करिता यापूर्वी मानवी साखळी इशारा आंदोलन तसेच दडपशाही झुगारून सिडको विरोधातील लाखोंच्या संख्येने यशस्वी घेराव आंदोलन करण्यात आले होते.तरी सुद्धा आंतर राष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि.बा. पाटील यांचे नाव देण्यात आले नाही.महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री उद्धवसाहेब ठाकरे यांनी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याची मागणी तशी एक प्रकारे घोषणाच केली होती. या मागणीला अनुसरून सध्या महाराष्ट्र राज्यात अस्तित्वात असलेल्या महाविकास आघाडीच्या काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी या राजकीय पक्षाच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाला जाहीर पाठिंबा दिला. तर रायगड, ठाणे, नवी मुंबई जिल्ह्यातील आगरी कोळी कराडी समाजाच्या विविध संस्था, संघटना, स्थानिक भूमीपुत्र,प्रकल्पग्रस्त यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाऐवजी लोकनेते स्वर्गीय दि.बा. पाटील यांचे नाव देण्यात यावे अशी मागणी केली. या मागणीमुळे रायगड, नवी मुंबई जिल्ह्यातील राजकारण पेटले. वादविवाद सुरु झाले. या वादात भारतीय जनता पक्षानेही उडी घेतली व स्थानिकांचे नेतृत्व असलेले लोकनेते दि.बा. पाटील यांच्या नावाला जाहीर पाठींबा दिला. भाजप, स्थानिक भूमिपुत्र, स्थानिक प्रकल्पग्रस्त यांच्याविरोधात महाविकास आघाडी(महाराष्ट्र शासन )असा वाद रंगला .भारत मुक्ती मोर्चा, वंचित बहुजन आघाडी, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट )या राजकीय पक्षांनी बहुजणांचे नेतृत्व दि.बा. पाटील यांच्याच नावाला जाहिर पाठिंबा दिला.महाराष्ट्र शासनाने (महाविकास आघाडीने)लोकनेते दि.बा. पाटील यांच्या नावाला विरोध नाही असे स्पष्ट केले. मात्र नाव देण्यास टाळाटाळ करत आहे.राज्य शासन अजूनही बाळासाहेब ठाकरे यांच्या नावावर ठाम आहे.यामुळे राज्य शासना विरोधात स्थानिक ग्रामस्थ, स्थानिक प्रकल्पग्रस्तामध्ये तीव्र असंतोष पसरला आहे.लोकनेते दि बा पाटील यांना लाखो भूमीपुत्रांचे समर्थन आहे.राज्यशासनच्या स्थानिक भूमीपुत्र, प्रकल्पग्रस्त विरोधी भूमिकेचा,राज्य शासनाच्या दडपशाहीचा निषेध करण्यासाठी व १६ ऑगस्ट तारखेपासून सुरू होणाऱ्या विमानतळाच्या काम बंद आंदोलनाची जनजागृती व्हावी,जनतेच्या जनभावनेचा आदर राज्य शासनाने केलेला नाही म्हणून, ‘’दडपशाही चले जाव’’ या मथळ्याखाली गावोगाव होणाऱ्या मशाल मोर्चाचे आयोजन केले असून त्याची सुरवात उरण तालुक्यातील जासई गावातून झाली.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments